नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास!

नोकरदार गृहिणी ते उद्योजक: एका मनस्विनीचा प्रवास!

नमस्कार, मी अनुजा अतुल राव. तसे तुम्ही नावाने कमी ओळखत असाल पण माझा चेहरा तुम्ही ओळखू शकाल कदाचित. एखाद्या उत्पादनाच्या, ब्रॅण्डच्या जाहिरातीत किंवा सोशल मीडीयावर नाहीतर क्वचित एखाद्या बातमीतही. कारण मी पूर्णवेळ शिक्षिका असली तरी एक मॉडेलही आहे आणि मॉडेलिंग, अभिनय तसेच जाहिरात क्षेत्रात काम करते. एका छोट्याश्या गावातील सामान्य घरातील मुलगी ते मॉडेल आणि आता उद्योजक हा माझा प्रवास मी आज तुमच्या समोर मांडणार आहे.

मी मध्यमवर्गीय वातावरणात लहानाची मोठी झाले. आई-वडिलांनी माझ्यासाठी शाळा, कॉलेज, नोकरी अशीच सर्वसाधारण चाकोरीबद्ध स्वप्ने बघितली  होती. पण माझा स्वभाव मुळातच महत्त्वाकांक्षी व जिद्दी असल्याने ही चाकोरी मोडून त्यापलीकडे काहीतरी करावं असं माझं स्वप्न होतं. यथावकाश शिक्षण पूर्ण करून शिक्षिका झाले. लग्न होऊन एका गोंडस मुलीची आईही झाले. मात्र मनाच्या कोपऱ्यात अजूनही ती स्वप्नं कुठेतरी साद घालत होती. स्वतःची वेगळी ओळख आणि एक वेगळे अस्तित्व असावे म्हणून मन ओढ घेत होते. 

मॉडेलिंग क्षेत्राचे मला पहिल्यापासूनच आकर्षण होते. या क्षेत्रात येण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व बाबी आपल्याकडे आहेत याची जाणीवही होती. मात्र मॉडेलिंग या क्षेत्राविषयी समाजात असणारे गैरसमज आणि या क्षेत्राकडे बघण्याचा चुकीचा दृष्टीकोन यामुळे या क्षेत्राच्या दिशेने माझे पहिले पाऊल थोडे उशिराच उचलले गेले. 

माझ्या प्रवासाची सुरुवात ‘’मनास्विनी मिसेस ठाणे -2016’’ च्या उपविजेते पदाने झाली. त्यानंतर मी Mrs.Tiara India -2017 व Mrs.India International-2017 सारख्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आणि तेथेही नेत्रदीपक यश मिळवले. एक गृहिणी ते शिक्षिका आणि पुढे मॉडेल ते उद्योजिका हा प्रवास तितकासा सोपा नव्हता. पण जिद्द आणि महत्त्वाकांक्षेच्या जोरावर मी ते साध्य करून दाखवले. 

ज्या स्पर्धेने माझा आत्मविश्वास प्रचंड वाढवला. ती स्पर्धा म्हणजे “मनस्विनी मिसेस ठाणे 2016”. त्या आधीच्या दोन सौंदर्यस्पर्धांमध्ये मला अपयश आले होते. पण निराश न होता मी 2016  मध्ये पुन्हा प्रयत्न केला व उपविजेते पद मिळवले. Mrs. Tiara India 2017 या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत मी Mrs. Tiara India Galaxy 2017 हे टायटल जिंकले तसेच Best Walk आणि Best Sport Person ही सबटायटल्सही कमावली.

त्यानंतर मार्च 2017 मध्ये झालेल्या Mrs. India International 2017 या अंतरारराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेमध्ये Mrs. India Mumbai International हे टायटल जिंकले व फायनलिस्ट  होण्याचा सन्मान मिळवला.

सौंदर्यस्पधांच्या विजेतेपदांमुळे चेहऱ्याला एक ओळख मिळाली व आपसूकच विविध संधी चालून येऊ लागल्या.

आतापर्यंत मी (नापतोल) Naptol, स्टार प्रवाह (Star Pravah), झी टीव्ही (ZeeTV), बेस्ट डील (Best Deal) यासारख्या प्रथितयश चॅनल्ससाठी काम केले आहे. त्याचबरोबर, बिग बझार (Big Bazaar), एरॉल हेल्थ टॉनिक (Erol Health Tonic), फोर्टिस हॉस्पिटल (Fortis Hospital), यांच्यासाठीही प्रोमो शूट आणि प्रिंट शूट केले आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. ‘मुंबई-पुणे-मुंबई’ तसेच ‘निर्मल’ यासारख्या उत्तम दिग्दर्शकांच्या चित्रपटांत काम करण्याचे भाग्य मला लाभलेले आहे. याशिवाय मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील अनेक नामांकित ब्रँड्स साठी मी फोटोशूट केले आहे.

माझ्या मॉडेलिंग क्षेत्रातील पाच वर्षाच्या यशस्वी प्रवासात मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. मॉडेलिंग या क्षेत्राविषयी आपल्या समाजात खूप गैरसमज आहेत. एका वेगळ्याच नकारात्मक दृष्टिकोनातून या क्षेत्राकडे पहिले जाते. तसेच या क्षेत्रात येण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा अनेक खोट्या आमिषांना ते बळी पडतात. ही सर्व परिस्थिती विचारात घेता मी माझे या क्षेत्रातील ज्ञान या सर्वांपर्यंत पोचवण्याचा निर्णय घेतला. याची सुरुवात म्हणून मी माझे इंस्टाग्राम हँडल @anuja_atul तसेच @arventureofficial आणि ट्रेल या ऍप्प वर @inspirewithanuja वर मॉडेलिंग आणि ग्रूमिंग बरोबरच या क्षेत्रातील इतर विषयांवर माहितीपूर्ण व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. या उपक्रमाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अलीकडेच मी माझे युट्युब चॅनल Inspire With Anuja वर काम सुरु केले आहे. त्यावरही भविष्यात अधिक माहितीपूर्ण व्हिडीओज देण्याचा मानस आहे.  

AR Ventures ही माझी संस्था मॉडेलिंग आणि ऍक्टिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या नवीन टॅलेन्ट आणि फ्रेशर्सना योग्य मार्गदर्शन करण्याचे काम करते. AR Ventures या माझ्या कंपनीचे अनेक उत्कृष्ट बॅनर्ससोबत बरोबर टाय-अप झालेले आहे. त्यामुळे नवोदितांना योग्य मार्गदर्शनाबरोबरच उत्तम संधीही आम्ही मिळवून देतो. 

हे क्षेत्रच प्रचंड आकर्षक आणि ग्लॅमरस असल्याने कायम प्रेझेंटेबल राहणं हे आवश्यक असते. आणि त्यासाठी मी नित्यनेमाने योगासने, डाएट आणि योग्य व्यायामावर लक्ष देते. तसंच गृहिणी, मॉडेल, शिक्षिका आणि एक उद्योजिका या साऱ्या भूमिका यशस्वीरितीने पार पाडण्यासाठी शरीराचे आणि मनाचे योग्य संतुलन राखणेही गरजेचे होते. केवळ शारीरिक दृष्ट्या नाही तर मानसिक दृष्ट्याही फिट राहणे गरजेचे होते. नियमित वाचन, ध्यानधारणा, योग, आहार आणि व्यायाम यांच्या मदतीने मी स्वतःचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न करते.

इथे मी एक गोष्ट सांगू इच्छिते की जेव्हा तुम्ही चाकोरी सोडून एखाद्या क्षेत्रात नाव कमविण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला प्रचंड नकारात्मक गोष्टींना सामोरे जावे लागते. तुमच्या इच्छाशक्तीच्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर तुम्हाला या सर्वांवर मात करावी लागते. आपला प्रत्यक्ष निर्णय बरोबरच ठरेल असे नसते. पण तुमच्या कार्यक्षमतेवर आणि ज्ञानावर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही अपयशावरही नक्की मात करू शकता. 

जेव्हा तुम्ही एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत असता तेव्हा एखादे छोटे अपयशही तुम्हाला निराशेच्या खोल गर्तेत ढकलू शकते. जेव्हा जेव्हा असे प्रसंग आले तेव्हा माझ्या कुटुंबाने मला प्रचंड सपोर्ट केलेला आहे. माझे पती, मुलगी आणि आई वडील ही माझी सपोर्ट सिस्टम आहेत. माझे सासरे आणि वाहिनी हे नेहमी मला नवीन उमेद देऊन पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देत असतात. ‘We are proud of you’ हे शब्द मला नेहमी उमेद आणि शक्ती देत असतात. 

माझे शिक्षक, मित्र तसेच मॉडेलिंग क्षेत्रातील अनेक मित्र व मार्गदर्शकही मला सतत सहकार्य करत असतात. त्यांचा प्रोत्साहनामुळेच मी एवढे मोठे पाऊल उचलण्याचे धाडस करू शकले.

माझ्या मते प्रत्येक स्त्री ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असायला हवी. गरज असते ती तिला तिच्या गुणांची जाणीव करून देण्याची. घरातल्या जबाबदाऱ्या स्त्रिया यशस्वीपणे पार पाडत असतात. पण त्याच बरोबर स्वतःचे एक वेगळे अस्तित्व असायला हवे याची जाणीव स्त्रीला होणे गरजेचे आहे. कारण प्रापंचिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून बहुतांश वेळा त्या ही गोष्ट विसरतात.

मॉडेल झाले तरी आपण एक शिक्षिका आहोत याचे भान नेहमी ठेवावे लागते. आपल्या कृतीतून किंवा वक्तव्यातून समाजाला कोणताही चुकीचा संदेश जाणार नाही याची मी कायम दक्षता घेते. 

एक यशस्वी स्त्री असले तरीही मी माझे शिक्षण थांबवले नाही. मी MA, BEd, MPhil पूर्ण केलेले आहे आणि सध्या पुणे विद्यापीठातून PhD करत आहे. सतत नवीन शिकत राहिल्याने तुमच्या व्यक्तिमत्वातील तजेला टिकून राहातो असे मला वाटते. अर्थात हे शिक्षण आपापल्या आवडी आणि क्षेत्रानुसार वेगळे असू शकते.   

वाचन ही अत्यंत महत्वाची गोष्ट आजची तरुणाई विसरतेय. सोशल मिडियाच्या प्रचंड भडीमारात तरुण भरकटलेले दिसतात. तुम्हाला जर कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करायचे असेल तर इतर यशस्वी व्यक्तींच्या सहवासात असणे फार गरजेचे आहे. आणि हा सहवास तुम्हाला पुस्तके मिळवून देतात असे मला मनापासून वाटते. आणि हे मीच नाही तर प्रत्येक यशस्वी व्यक्ती तुम्हाला सांगेल. तरुणी आणि स्त्रियांनी तर नक्कीच वाचनाची सवय लावून घ्यायला हवी असे मला वाटते.

स्वतःची स्वप्ने आणि इच्छा यांकडे ‘जग काय म्हणेल’ म्हणत दुर्लक्ष करून माघार घेण्यापेक्षा स्वतःला त्या दृष्टीने प्रेरित करा, तयारी करा आणि कामाला लागा. 

तुम्हाला यशाच्या दिशेने नेण्याची क्षमता एकच व्यक्तीमध्ये आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘तुम्ही स्वत:’

‘Self motivation is the best motivation!’

-अनुजा राव

संस्थापक, ए. आर. व्हेंचर्स.

फेसबुकइंस्टाग्रामयुट्युबट्रेल | वेबसाईट

Read Also:

Related posts

Leave a Comment