विमा आणि गुंतवणूक

विमा आणि गुंतवणूक

विमा आणि गुंतवणूक (Insurance & Investment) ची गोष्ट …

जनसामान्यांमध्ये विमा आणि गुंतवणूक या दोन गोष्टींबद्दल कमालीची कन्फ्युजंस, समज गैरसमज आढळून येतात. आणि आजकाल जश्या जश्या  पेन्शन मिळणाऱ्या नोकऱ्या कमी होत चालल्या आहेत त्या प्रमाणात हे गैर समज वाढत असल्याचे दिसून येत आहे.
सामान्यत: हातात असलेला पैसा कुठेतरी गुंतवला की मनावरचे दडपण कमी होते. (असं आपल्याला वाटतं) पण आपण काही गोष्टी साफ विसरून जातो, उदाहरणार्थ :

1) आपल्याला नक्की काय हवे होते अथवा आहे?

2) आपल्याला जे हवे होते, ते या व्यवहारातून मिळणार आहे का?

3) जे आऊटकम या व्यवहारातून मिळणार आहे ते आपल्याला पुरेसे अथवा उपयोगाचे आहे का?

4) व्यवहारातून नफा मिळणार आहे का? “Risk-cover” काय आहे?

5) आपण जो व्यवहार केलाय तो फक्त आपल्यालाच उपयोगी आहे? का पूर्ण कुटुंबाला त्याचा उपयोग होणार आहे?

6) आपण जे पैसे व्यवहारात गुंतवत आहोत, त्याची विल्हेवाट समोरील कंपनी/एजन्सी/इंश्युरर कशी लावणार आहे?

तर एकंदरीत असं पाहिलं, तर १० मधील ७ व्यक्तीना  वरील प्रश्नांची आणि त्यांच्या उत्तरांची कल्पना असेलच असं नाही. त्यामुळेच की काय फसव्या किंवा कमी प्रतीच्या गुंतवणूक कंपनीज किंवा विमा कंपनीजचं फावतं . म्हणून कोणतीही गुंतवणूक करण्या आधी, जसं आपण आपल्या घरच्या लोकांशी सल्ला मसलत करतो, त्याच प्रमाणे आपले कौटुंबिक “कर-सल्लागार” किंवा “चार्टर्ड-अकौंटंट” यांच्याशी चर्चा करण्याची खुणगाठ बांधणे प्रत्येकासाठी फार गरजेचे आहे.
पण नुसतं त्या चर्चेने भागणार नाही. आपल्याला स्वत:स सुद्धा काही अतिशय बेसिक बाबींची माहिती असणे फार गरजेचे आहे. आपण येथे आता काही अश्याच बाबींवर थोडी चर्चा करू आणि काही गोष्टीमधील बेसिक फरक समजावून घ्यायचा प्रयत्न करू.


1)फीज,कमिशन,चार्जेस इत्यादी ?

बरेचदा असा अनुभव येतो की लोक कमीतकमी पैश्यात जास्तीत जास्त “कमाई/फायदा” कशी/कसा होईल हे पहातात. इथेच खरी गोम आहे. आपणं पहिल्यांदा हे समजावून घेतलं पाहिजे की समोरची (विमा/गुंतवणूक) कंपनी सुद्धा धंदा करायला बाजारात उतरलेली आहे. सबब “There are NO Free Lunches !!”  हे कायम लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे, प्रत्येक कंपनी तुम्ही त्यांच्याशी करत असलेल्या प्रत्येक व्यवहारात काही प्रमाणात “नफा” कमावणारच हे पक्कं लक्षात घ्यायला हवं. पण कोणताही व्यवहार करायच्या आधी लेखी स्वरूपात वरील चार्जेस आणि आकाराची माहिती घेणे फार महत्वाचे ठरते.

2)विमा का गुंतवणूक?(Insurance or Investment)

यानंतर  आपल्याला आता नक्की कोणता व्यवहार करायचा आहे याचे “One-to-One Analysis” करणे फार गरजेचे आहे. कारण बऱ्याच लोकाना विमा आणि गुंतवणूक यातला नक्की फरक काय ? या बद्दल बरेच समज-गैरसमज आहेत. त्यामुळे या दोघांतील बेसिक फरक समजावून घेणे फार महत्वाचे आहे.
विमा V/s गुंतवणूक

a)      विमा हा आपण आपल्या “जिवीताचे” अथवा “आरोग्याचे” रक्षणार्थ अथवा भरपाईस्तव काढतो. गुंतवणूक ही फक्त “फायदा” कमावण्यासाठी केली जाते.

b)      विम्या मधून साधारणत: “रिटर्न्स” ची अपेक्षा धरणे टाळावे. पण गुंतवणुकीतून काही न काही प्रमाणात फायदा हा व्हायलाच हवा. तसेच, गुंतवणुकीतून “जिवीत/आरोग्य” रीस्क कवर चा विचार करणे संयुक्तिक नाही कारण गुंतवणूक ही विमा नसते.

c)      विमा हा साधारणत: स्वत:चा, कुटुंबाचा, वस्तूंचा किंवा अवलंबून व्यक्तींचा काढला जातो. यावर ठरते की “जिवीत/आरोग्य” हानी झाल्यास पैसा कोणास / कधी मिळेल. पण गुंतवणूक ही मुख्यत: स्वत:च्या (Joint अथवा Co-investment अपवाद वगळता ) नावावर केली जाते.

d)      विमा ही बाब प्रत्येकास अत्यंत गरजेची आहे. गुंतवणुकीचे तसे नाही , गुंतवणूक न करता आपण आपला पैसा ठेवींच्या स्वरूपात बँकेत ठेऊ शकता.

e)      या शिवायही काही फरकांचा बारकाईने विचार करणे आवश्यक आहे. परंतू बेसिक फरक जाणून घेण्यासाठी वरील मुद्दे पुरेसे आहेत.


3)योग्य कंपनी निवडणे !!

आपण एकदा मुद्दा क्र १ आणि २ समजावून घेतले की आता आपला प्रवास पुढे सरकतो. आता पुढचा प्रश्न हा, की कोणाशी व्यवहार करायचा? या प्रश्नाचे इथ्यंभूत उत्तर कर सल्लागार देईलच पण आपणही “घराचा अभ्यास” करणे तितकेच महत्वाचे आहे.
तर एकंदरीत आपल्याला ज्या गोष्टीचा व्यवहार करायचा आहे, म्हणजे गुंतवणूक अथवा विमा, त्या क्षेत्रात काम करणाऱ्या कंपनीज चे काही “Vital Stats” पाहणे फार गरजेचे ठरते.

उदा:
तुम्हाला जर विमा काढायचा असेल किंवा गुंतवणूक करायची असेल तर  ,

a)      क्लेम सेटलमेंट रेशियो किंवा “EPS” अर्थात अर्निंग पर शेयर.

b)      कंपनीचा मार्केट शेयर. (अर्थात दर १०० लोकांमागे किती लोक कोणत्या कंपनीत गुंतवणूक करतात किंवा विमा घेतात )

c)      सद्य परिस्थितीत कंपनीविरुद्ध चालू असलेले काही खटले ई. आरबीआय, आयआरडीए  ई. संस्थानी कंपनीबद्दल ओढलेले ताशेरे किंवा कौतुकाचे शब्द. 

d)      ऑप्शनल रायडर्स, कंपलसरी रायडर्स, अटी ई.  स्वीच चार्जेस , फंड हाउस चार्जेस अशा व ईतर महत्वाच्या बाबीची माहिती.

e)      कंपनी ची आर्थिक स्थिती आणि “फायनंशियल हिस्ट्री”.

f)       आजूबाजूचे लोक ज्यांनी या कंपनी शी व्यवहार केला आहे त्यांचे अनुभव.

g)      तुम्ही घेत असलेल्या “प्रोडक्ट” ची इथ्यंभूत “लेखी” माहिती.

h)      कंपनीचा “असेट-बेस”, “मार्केट सिक्योरिटी आणि कॅपिटलायझेशन”.

i)       कंपनीच्या “Management staff and Key Persons”  बद्दल माहिती .

या आणि अश्या काही बेसिक गोष्टींबद्दल तरी किमान माहिती असणे प्रत्येकास गरजेचे आहे.


4) गुंतवणूक आणि विमा – वाटणी ?

बरेचदा असे आढळून येते की लोक गरजेपेक्षा जास्त गुंतवणूक अथवा विमा काढून ठेवतात. आता यात आणखीन त्रासाचा भाग हा आहे की गुंतवणूक एकवेळ जास्त झाली तर त्यात सुधारणा करून आपण योग्य तितकी गुंतवणूक चालू ठेवू शकतो, पण विमा करताना एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी की विमा हा आपल्या सरासरी उत्पन्नाच्या जास्तीत जास्त १० पटच घ्यावा. जास्त घेतल्यास आपला क्लेम “पेंडन्सी” मध्ये जाऊन कायदेशीर बाब उत्पन्न होण्याचा संभव असतो. त्याचप्रमाणे हे ही लक्षात ठेवणे गरजेचे आहे की गुंतवणूक हा काही विम्याला पर्याय ठरू शकत नाही. आणि त्याच प्रमाणे विमा हा काही गुंतवणुकी ला पर्याय ठरू शकत नाही.
त्यामुळे विमा काढताना, समजा आपणा स्वत:स काही झाले तर आपण काढलेली कर्जे, मुलांची शिक्षणं, लग्न, इतर जवाबदाऱ्या पूर्ण करून आपल्या जोडीदारास पुढील १० वर्षे तरी तरतूद होईल इतक्या “सम-अश्योर्ड” चा विमा काढणे हा “थंब-रूल” कायम पाळला पाहिजे.

या शिवाय, आपल्या जीवितास हानी होऊन आपण कमावते राहू शकत नाही, अशी शक्यता गृहीत धरून त्या प्रकारचा विमा असणे सुद्धा फार महत्वाची बाब आहे. त्यामुळे टर्म आणि मेडिक्लेम या विमा प्रकारांची माहिती असणे गरजेचे आहे. (याबद्दल मध्ये पुढील लेखात)
हे केल्यानंतर, जे काही “Surplus” उरते ते बिनबोभाटपणे कोणत्याही गुंतवणूक प्रकारात आपण ठेवू शकतो. सबब, विमा किंवा गुंतवणूक? असा प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित होतो, तेव्हा तेव्हा वरील बाबींकडे लक्ष देऊन तसे निर्णय घेतल्यास आपला तोटा होणार नाही हे निश्चित.

5)आयकरा-बद्दल विचार !!

वरील सर्व विचार केल्यानंतर , एक सगळ्यात महत्वाची बाब उरते ती म्हणजे आयकर किंवा आयकर सवलती बद्दल माहिती. त्याबद्दल मी इथे आत्ता अगदी ढोबळ मानाने काय माहित हवं ते सांगतो :

*गुंतवणूक

केलेली गुंतवणूक Chapter VI किंवा कलम ८०/८०सी च्या अंतर्गत सुट मिळवून देते का ?

केलेल्या गुंतवणुकीचा परतावा (Maturity) करपात्र आहे का करमुक्त आहे ?

आपण गुंतवणूक Short term goals करता करतोय का  Long Term Goals करता ? (याबाबत लेखमालेच्या पुढील भागात)

*विमा –

विम्याचा हफ्ता Chapter VI किंवा कलम ८०/८०सी च्या अंतर्गत सुट मिळवून देतो का ?

विम्याचा परतावा करपात्र आहे का करमुक्त आहे ?

कोणाचा विमा काढल्यास तो करपात्र अथवा करमुक्त आहे ?

विमा किती मर्यादे पर्यंत करमुक्ती मिळवून देतो ?

आपण कोणाकोणाचा विमा काढू शकतो ?

पुढील लेख: टर्म इन्शुरन्स(Term Insurance)

लेखकाविषयी

सीए केदार दत्तात्रेय गोगटे

(B.Com; F.C.A.; M.C.A.; D.I.S.A. (ICAI’ New Delhi), Cert. Fraud Analyst and Investigator (ICAI New Delhi); Certified Bank Concurrent Auditor (ICAI New Delhi); Cert CBA (ICAI); IBM Certified Work-flow, Content Designer & Developer) 

हे औरंगाबाद येथील प्रतिथयश “सनदी लेखापाल” (Chartered Accountant) आहेत. गेल्या १०+ वर्षांपासून ते विविध प्रकारच्या लोकांना करविषयक, व्यवसाय विषयक, Technology विषयक मार्गदर्शन करत आहेत.
तसेच ते Corporate Trainer म्हणून सुद्धा कार्यरत असून विविध अस्थापना, तंत्रशिक्षण व व्यवस्थापन संस्थांमध्ये लोकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतात.

संपर्

आपल्या मनात कुठल्याही शंका असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. आम्हीतुमच्या शंकांचे समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करू.

sours link: https://invest-mentors.blogspot.com/2015/05/blog-post_2.html

Related posts

Leave a Comment