नोकरी ते उद्योजकता: एक ध्येय वेडा प्रवास!

मी स्वयंपाक कधी करायला लागलो हे खरेच आठवत नाही, पण स्वयंपाक करायला लागलो याचे कारण मात्र माझे बाबा होते. बाबा मुळातच खवय्ये होते आणि आई सुगरण, त्यामुळे आमच्या घरात चमचमीत पदार्थांची रेलचेल असायची. बाबांच्या या खवय्येगिरीमुळेच असेल कदाचित, मला स्वयंपाक करायची आवड निर्माण झाली. अर्थातच शिकवायला आई होती, त्यामुळे शाळा-कॉलेजात असताना ती स्वयंपाक करताना कधीतरी स्वयंपाकघरात जाऊन ती काय करते हे बघणे एवढ्यापुरतेच माझे स्वयंपाक करणे मर्यादित होते.  

नंतर कामानिमित्त अमेरिकेत गेलो आणि बॅचलर म्हणून मित्रांसोबत राहिलो. तिथे लक्षात आले की कोणालाच स्वयंपाक येत नाही! मग त्यातल्या त्यात वासरात लंगडी गाय शहाणी, म्हणून मी स्वयंपाक करायला लागलो. याचा दुसरा फायदा असा झाला की आपण स्वयंपाक करून मोकळे झालो की भांडी वगैरे घासायची जबाबदारी आपसूक आपल्यावर पडायची नाही! हळूहळू स्वयंपाकाची आवड वाढत गेली आणि मग पुढे लग्न झाल्यानंतर फॅमिली गेट-टुगेदर, पार्टी, मित्र-मैत्रिणींचे गेट-टुगेदर यासाठी मी आवर्जून इंटरनेटवर रेसिपी शोधून शोधून आवडीने बनवून त्यांना खायला घालायला लागलो. टीव्हीवर फूड चॅनल्स बघून नवीन पाककृती शिकायला लागलो.

यथावकाश सोशल मीडिया सुरू झाल्यावर मी बनवलेल्या पदार्थांच्या रेसिपी त्यावर टाकायला लागलो. मग एक दिवस हिम्मत करून स्वतःचा डोमेन विकत घेतला आणि माझ्या पककृतींना एक कायमचे घर मिळाले, ह्यातूनच http://www.EatLiveCook.comचा जन्म झाला.

हे सुरू असताना मनात कुठेतरी एक रुखरुख होती. मूळचा मेकॅनिकल इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतलेला मी, २० वर्षे आयटी क्षेत्रात काम करत होतो. पण माझे मन मात्र फूड किंवा कुलिनरी जगात अधिक रमत आहे, हे कळायला लागले होते. पण मग ह्याचे नक्की काय करावे हे कळत नव्हते. “तू रेस्टॉरंट काढ” असे बऱ्याच लोकांनी अनेक वेळा मला सुचवले, पण मुळात आवड असली तरी त्या बाबतीत मला काहीच ज्ञान नव्हते. आणि माझी एक धारणा होती की आपण कुठल्याही क्षेत्रात उतरायचे तर त्याचा अभ्यास करूनच. कमर्शियल किचनमध्ये काम करायचे म्हणजे मग त्यामागे आपल्याला प्रशिक्षण हवे.

अशी घालमेल सुरू असताना, २०१६ मध्ये मला अचानक कुलिनरी अकॅडमी ऑफ इंडियाच्या पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कुलिनरी आर्ट्सच्या एक वर्षाच्या कोर्सबद्दल माहिती मिळाली.

या कोर्समध्ये ऍडमिशन घेण्यासाठी मला हैदराबादला जाऊन त्यांची एन्ट्रन्स टेस्ट द्यावी लागणार होती. मी ऍप्लिकेशन फॉर्म भरण्याआधी माझ्याबद्दल थोडी माहिती, त्यात माझे फूडबद्दलचे पॅशन याबद्दल त्यांना ई-मेलवर लिहिले. मला त्यांच्याकडून अर्ज करण्याची परवानगी आली आणि रीतसर फॉर्म भरून मी परीक्षेसाठी हैदराबादच्या त्यांच्या कॅम्पसवर गेलो.

हा अनुभव अतिशय सुंदर होता आणि बरेच काही शिकवून गेला. तिथे खरे तर सगळी तरुण मंडळी परीक्षेसाठी आली होती आणि मीच एकटा चाळिशीच्या वर होतो! या परीक्षेचे स्वरूप म्हणजे एक लेखी परीक्षा, एक मुलाखत आणि मग तीन तासाचे कुकिंग सेशन असे होते! या तीन तासांमध्ये आम्हाला एक थ्री कोर्स मील तयार करायचे होते. अर्ज करताना तुम्ही काय पाककृती तयार करणार आहात, आणि त्याला लागणारे जिन्नस ह्याची यादी आधीच पाठवून दिली होती. मला टेन्शन होते ते फक्त तीन तासांत आपल्या ठरवलेल्या गोष्टी व्यवस्थित होतात का नाही याची. पण खरे तर ते तीन तास मला अतिशय आनंद देऊन गेले. मी अगदी सराईतपणे त्यांच्या टेस्ट किचनमध्ये स्वयंपाक करू शकलो!
परीक्षक म्हणून एका नामांकित हॉटेलमधले हेड शेफ आले होते, त्यांनीदेखील माझ्या स्वयंपाकाचे बरेच कौतुक केले, त्यामुळे भरपूर आत्मविश्वास वाढला.

माझी मुलाखत आणि लेखी पेपरही चांगला गेला. पण मुलाखतीत त्यांच्या डायरेक्टर सरांनी मात्र मला पूर्वकल्पना दिली की तुझे वय आमच्या कोर्सच्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत नाही. पण तरीही त्यांनी आश्वासन दिले की ते प्रयत्न करतील आणि उस्मानिया युनिव्हर्सिटीशी संपर्क साधून काही अपवाद घेता येईल का ते बघतील. दुर्दैवाने ते शक्य झाले नाही आणि मी ऍडमिशनला मुकलो. पण हा अनुभव मात्र खूप काही देऊन गेला.

एक तर माझा आत्मविश्वास वाढला की मी काहीतरी वेगळे करू शकतो आणि मी आणखी जोमाने माझ्या नवनवीन पाककृती तयार करून त्या माझ्या ब्लॉगवर आणि नंतर misalpav.com या संकेतस्थळावर मराठीतून लिहायला लागलो. मिसळपाव.कॉमवरील माझ्या पाककृती http://misalpav.com/user/27618/authored इथे वाचायला मिळतील.

दरम्यानच्या काळात, मुलांच्या हट्टाखातर आम्ही घरात एक पाळीव प्राणी म्हणून कुत्रा घेतला. खरे तर कुत्रा पाळायला माझा विरोध होता, कारण फ्लॅट सिस्टिममध्ये कुत्र्याची देखभाल नीट होईल की नाही याची मला भीती होती. पण मला खरेच कल्पना नव्हती की ह्या कुत्र्यामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी आणि दिशा मिळणार आहे!

ब्रीडरच्या आणि बोल्टच्या (आमचा कुत्रा) व्हेटच्या (पशुवैद्याच्या) सल्ल्यानुसार आम्ही त्याला बाजारू जेवण (कमर्शियल डॉग फूड) द्यायला लागलो. त्याच्या जेवणात कॅल्शियम आणि व्हिटॅमिन ड्रॉप्स टाकून दिवसातून ४ वेळेला एक छोटी वाटी डॉग फूड त्याचे फीडिंग होऊ लागले.

हे सुरू असताना लॅब्रॅडोर आणि एकंदर कुत्रा ह्याबद्दल आंतरजालावर भरपूर वाचून काढले. आतापर्यंत बघितलेले सगळे लॅब अतिशय थुलथुलीत, स्थूल असे बघितल्यामुळे ह्याबद्दल आपल्याला काय करता येईल हा विचार मनात आला आणि इथून खऱ्या अर्थाने माझी ‘श्वान प्रवासाची’ सुरुवात झाली.

कुत्र्यांना काय खायला द्यायला हवे, काय नको, त्यांच्या पचनसंस्थेवर कुठल्या प्रकारचे खाद्य विपरीत परिणाम करते, काय अनुकूल आहे याबद्दल आणि सध्या बाजारात मिळणाऱ्या डॉग फूडबद्दल आणि त्याच्या दुष्परिणामांबद्दलदेखील भरपूर वाचन केले. (ह्याबद्दल पुढे जाऊन मी लेखन केले, http://www.shvaan.com/demystifying-dog-food/).

आमच्या कुत्र्यासाठी मग मी घरात काही वेगवेगळे प्रयोग करू लागलो. त्याच्या जेवणात काय घालता येईल, काय नको, काय आवश्यक आहे यावरून पाककृतीमध्ये योग्य तो बदल करून त्याला खायला घालत राहिलो. तब्बल दोन वर्षे हे असे वेगवेगळे प्रयोग करून सरतेशेवटी जन्माला आले ते म्हणजे ‘श्वान’चे पहिले प्रॉडक्ट!

आपल्या पाळीव कुत्र्याला एक संतुलित (बॅलन्स्ड) आहार कसा देता येईल याकडे कल जास्त होता.

माझ्या कुत्र्यामध्ये झालेले बदल पाहून आधी मित्रपरिवार, मग सोसायटीमधले इतर श्वानप्रेमी यांनी मला विचारणा सुरू केली आणि मग याबद्दल आपल्याला काय करता येईल यावर विचारमंथन सुरू झाले. आधी जवळच्या लोकांना, मित्रपरिवाराला किंवा ओळखीतून आलेल्या लोकांना मी हे प्रॉडक्ट) द्यायला लागलो. हळूहळू त्याचा विस्तार वाढत गेला. तिकडे आयटीमध्ये नोकरी सुरू होती, त्यामुळे हा सगळा उद्योग वीकएंडला करावा लागायचा. यात मला खंबीरपणे साथ दिली ती म्हणजे माझ्या आईने आणि माझ्या बायकोने! आठवडाभर ऑफिसमध्ये बारा-बारा तास काम करून वीकएंड खरे तर आरामाचा समजला जातो, पण आमच्या घरी मात्र वीकएंडला ह्याच्या बॅचेस तयार करणे सुरू असायचे. मला आठवतेय, कधीकधी तर शुक्रवारी रात्री घरी येऊन मग शनिवार पहाटे पहाटेपर्यंत आम्ही काम करत असायचो, कारण दुसर्‍या दिवशी कस्टमरला डिलिव्हरी द्यायची असायची! ह्या सगळ्यात खरे तर भरपूर दमून जायचो, पण तरीही त्याच उत्साहात आणि चिकाटीने पुढच्या वीकएंडला आम्ही पुन्हा तयार असायचो!

आधी स्वतःच्या कुत्र्याला द्यायला पाहिजे म्हणून छोट्या बॅचेस करायचो (१० किलो), आता मात्र ते वाढवावे लागले. हे खाद्य ऑल नॅचरल Wet Dog Food असल्यामुळे, टिकावे म्हणून मग जेव्हा घरातला फ्रीज कमी पडू लागला, तेव्हा एक डीप फ्रीझर विकत घेतला. पूर्वी हाताने करायची कामे आता थोडी पटकन व्हावी म्हणूंन मग एक पल्व्हरायझर मशीन घेतले. हळूहळू श्वानसाठी लागणारी मोठी भांडी, शेगड्या विकत घेतल्या.

अडचणी अनेक आल्या. एकदा वीज गेल्यामुळे एक बॅच खोळंबली आणि शेवटी सगळी बॅच खराब होईल ह्या भीतीने फेकून द्यावी लागली! पल्व्हरायझर मशीनमधून पहिल्यांदा प्रॉडक्ट काढले, तेव्हा ते खूप चिकट आहे असा कस्टमर फीडबॅक मिळाला, त्यावर तोडगा शोधून प्रोसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट आणली. आधी साध्या पॉलिथीन बॅगमध्ये भरून चक्क मेणबत्तीवर सील करून बॅग द्यायचो, आता व्हॅक्यूम सील्ड फूड ग्रेड बॅग्जपर्यंत प्रगती झाली.

एका कस्टमरपासून सुरू झालेला हा प्रवास आता २५ कस्टमर्सपर्यंत पोहोचला! इतर लोकांना हे प्रॉडक्ट द्यायला लागल्यापासून एक वर्ष होत आले आणि जवळजवळ एक मेट्रिक टन प्रॉडक्ट मी यशस्वीरित्या लोकांना दिलेले होते, त्यामुळे आता यात नक्कीच काहीतरी करण्यासारखे आहे, हा विचार आता पक्का झाला होता. १ जानेवारी २०१८ रोजी मी एका प्रोप्रायटरी फर्मचे रजिस्ट्रेशन करून टाकले आणि त्यातून जन्म झाला तो ‘बोल्ट फूड्स’चा!(Bolt Foods) श्वान या ब्रँडखाली आम्ही आमचे प्रॉडक्ट लॉन्च केले. श्वानचे संकेतस्थळ (वेबसाइट) तयार करून घेतले आणि सोशल मीडियासाठी श्वानचे फेसबुक पान, इन्स्टाग्राम आणि ट्विटर हँडल करून सोशल मीडियावरून त्याची जाहिरात सुरू केली.

श्वानचा पसारा हळूहळू वाढायला लागला होता. वर्ड-टू-माउथ पब्लिसिटीमुळे आणि सोशल मीडियामुळे कस्टमर्स वाढत गेले. फक्त वीकएंड्सना सगळी कामे करणे आता अवघड वाटायला लागले. प्रॉडक्ट लाइनमध्ये आणखी २ प्रॉडक्ट्स वाढवली आणि तीदेखील श्वानांच्या पसंतीस उतरली.

मग एक दिवस शांतपणे मी आणि बायकोने चर्चा करून ह्यात मी पूर्ण वेळ द्यायचा, असे ठरवले. सप्टेंबर २०१९मध्ये नोकरीचा राजीनामा दिला आणि स्वतःला ‘श्वान’मध्ये झोकून दिले.

पण मार्च २०२० आलाच तो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात कोरोना आणि लॉकडाउन हे दोन नवीन शब्द घेऊन! ह्या काळात ‘श्वान’ची निर्मिती करणे अवघड होत गेले. लॉकडाउनमुळे श्वान घरोघरी पोहोचवणे दुरापास्त होऊ लागले. इथे मात्र मला साथ मिळाली ते अतिशय संयमी आणि निष्ठावंत कस्टमर्सची! सगळ्याच कस्टमर्सनी आमच्या सोसायटीच्या दारात येऊन श्वान घेऊन जाण्याला मान्यता दिली! ह्याने आम्हाला एक प्रचंड दिलासा मिळाला आणि आपल्या प्रॉडक्टच्या गुणवत्तेबद्दलचा आत्मविश्वास आणखीनच वाढला! कोरोनाच्या कठीण काळातदेखील ‘श्वान’ तरून आहे, तग धरून आहे ती मात्र नक्कीच आमच्या प्रॉडक्ट्सच्या गुणवत्तेला एक छोटीशी सलामी आहे असे मी समजतो.

एक नोकरदार आयटी प्रोफेशनल ते एक छोटा उद्योजक असा प्रवास सुरू आहे. भरपूर शिकायला मिळतेय, अनुभवायला मिळतेय जे बहुधा नोकरी करताना शक्य झाले नसते.

आज श्वानसाठी २ कामगार पूर्णवेळ काम करत आहेत. एकट्या बोल्टपासून सुरु झालेल्या या प्रवासात आता विविध जातींचे शेकडो श्वान जोडले गेलेत. श्वानच्या नवीन लोगोच्या आणि नवीन पॅकेजेसच्या डिझाइनवर काम सुरू आहे. मनात बऱ्याच शंका आहेत, अनेक अडचणी आहेत, पण त्याची उत्तरे शोधताना, त्यावर मात करताना मज्जा येते आहे.

नोकरी करताना बऱ्याच वेळेला कामाच्या संबंधित निर्णय तुमच्या हातात नसतात, कधीकधी ते तुमच्यावर लादलेही जाऊ शकतात. इथे मात्र निर्णय आणि त्याचे होणारे परिणाम याला मलाच सामोरे जायचेय, त्यामुळे एक थोडीशी का होईना मोकळीक मिळते आहे. अर्थात इथे मोठ्या चुका महागात पडू शकतात, त्यामुळे प्रवास आणि निर्णय विचारपूर्वक सुरू आहे.

ह्यात मला खरी मोलाची साथ मिळाली आहे ती म्हणजे माझ्या घरच्यांची आणि मित्रमंडळींची, ज्यांचा मी सदैव ऋणी आहे.

केदार दीक्षित
http://www.Shvaan.com
Facebook|Instagram|Twitter|
@ShvaanDogFood

Related posts

Leave a Comment