टर्म इंश्युरंस(Term Insurance)

टर्म इंश्य्युरंस(Term Insurance)

आज आपण या भागात टर्म इंश्युरंस(Term Insurance) चे विविध प्रकार, त्याबाबत असलेले काही समज-गैरसमज आणि काही इंश्युरंस विकत घेण्यापुर्वीच्या काही बेसिक बाबी यांच्या वर चर्चा करूयात.
मागील भागात आपण कोणताही इंश्युरंस घेण्याआधी काय काय सावधानता बाळगायला पाहिजे ते बघितलं. पण ही सगळी कसरत तिथेच थांबत नाही. उलट खरी कसरत इथून पुढे सुरू होते.
ईश्युरंस घेताना आपण बरेच शब्द ऐकतो, टर्म इंश्युरंस, हेल्थ इंश्युरंस, लाईफ इंश्युरंस,जनरल इंश्युरंस ईत्यादी. आपण या सगळ्यांबद्दल इथून पुढे जाणून घेउत. पण हे करत असताना, मागील भागात दिलेल्या टिप्स लक्षात ठेवणे आणि बरहुकूम पाळणे गरजेचे आहे.
त्या व्यतिरिक्त, कोणताही ईश्युरंस घेताना खालील बाबींचाही विचार करणे अतिशय गरजेचे आहे. जसे की,

 1. इंश्युरंस चा टाईप कोणता आहे ? म्हणजेच हेल्थ , टर्म, लाईफ ,वैयक्तिक अपघात विमा (PA कावर) जनरल ईत्यादी
 2. इंश्युरंस घेण्याची/काढण्याची बरोब्बर वेळ.
 3. ईश्युरंस ची PPT अर्थात प्रीमियम पेइंग टर्म.
 4. इंश्युरंस कवरेज ची व्याप्ती.
 5. इंश्युरंस पॉलीसी सोबत येणारे रायडर्स व वेगळे विकत घ्यावे लागणारे Top-up रायडर्स.
 6. इंश्युरंस प्रीमियम आणि मिळणारे कवरेज यांचा तौलनिक अभ्यास.
 7. आपली गरज आणि भविष्यातील गरजांचे प्लानिंग .

या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपण आता एकेक करून इंश्युरंस च्या प्रकारांबद्दल सविस्तर चर्चा करू.

आपला आजचा विषय घेउया: टर्म इंश्युरंस(Term Insurance):

ढोबळ मानाने पहाता, हा ईश्युरंस चा असा प्रकार आहे की तो प्रत्येकानेच घ्यायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे. आपल्या देशातील अपघात, रोगराई, जीवनमान आणि नवनवीन उजेडात येत असलेले रोग/आजार पाहता इंश्युरंस हा आपल्या जीवनाचा एक आधारस्तंभ आहे असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही. आपल्या देशात इंश्युरंस या प्रकाराबद्दल एकंदरीतच उदासीनता आणि अज्ञान दिसून येते. हे ही काळजीचे ठरू शकते.
आपण साध्या शब्दात जर समजून घ्यायचं झालं तर आपण या इंश्युरंस च्या प्रकारास “पोस्ट-मोर्टेम” इंश्युरंस सुद्धा म्हणू शकतो. कारण की, या प्रकारचा जो इंश्युरंस असतो, त्याची “सम अश्योर्ड” ही इन्श्युर्ड व्यक्तीच्या निधना नंतरच मिळते. त्यामुळे आपण या प्रकारच्या इंश्युरंस ला आपल्या हयातीनंतर आपल्यावर अवलंबून असलेल्या लोकांसाठीच्या “भविष्यातील उत्पन्नाची तजवीज” असेही म्हणू शकतो.

अर्थात, इंश्युरंस घेताना नाण्याच्या २ ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजे. आपल्याला वरील प्रकारच्या इंश्युरंस चा तेव्हाच फायदा होईल जेव्हा आपण खालील बाबींचे कटाक्षाने पालन करू :

 1. ड्यू असलेला प्रीमियम वेळेत अथवा ग्रेस पिरेड च्या आत भरणे.
 2. इंश्युरंस पहिल्यांदा घेताना आपल्या आरोग्य-जीवनमान-मेडिकल हिस्ट्री आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दल तंतोतंत खरी माहिती देणे.
 3. इंश्युरंस घेताना PPT आणि कवरेज चा वेळ (अबक वर्षे) हा निट तपासून पाहणे.
 4. आपल्या उत्पन्नाचे बरोबर आणि खरे विवरण देणे.
 5. शक्यतो प्रीमियम स्वत: भरणे, म्हणजेच एजन्सी, नोकर, इतर व्यक्ती यांवर अवलंबून न राहता तो भरला गेला आहे याची स्वत: खात्री करून घेणे.
 6. इंश्युरंस काढल्यानंतर काही काळाने व्याधी जडल्यास तशी नोंद कंपनी च्या दफ्तरात होईल असे कटाक्षाने पाहणे.
 7. नॉमिनी ची नोंद न चुकता करणे.
 8. कोणत्या प्रकारचा मृत्यू या पॉलिसी मध्ये “कव्हर” आहे हे न चुकता पहाणे. आणि शक्य असल्यास “अपघात मृत्यू / दंगली ” असे रायडर्स उपलब्ध असल्यास ते सुद्धा घेणे.

किती घ्यावा टर्म इंश्युरंस(Term Insurance)?

साधारणत: टर्म इंश्युरंस घेताना, आपल्या नजीकच्या काळातील टार्गेटस आणि दूरच्या भविष्यातील टार्गेटस यांचा सारासार विचार करून अन त्याला किती पैसा लागू शकतो याचाही विचार सोबत करून, तितकी “सम अश्योरर्ड” आपल्यावर अवलंबून लोकाना (Nominees) खात्रीने मिळेल इतका इंश्युरंस पुरेसा ठरतो. 

अत्यंत ढोबळ मानाने पाहता आपल्या वार्षिक सरासरी उत्पन्नाच्या किमान १० ते कमाल ३० वर्षे अश्या “सम अश्योर्ड” चा इंश्युरंस आपण काढू शकतो.

अर्थात हा मिळण्यासाठी अनेक बाबी इंश्युरंस कंपनी सुद्धा गृहीत धरते , जसे की , वय, उत्पन्न, सध्या असलेले आजार, आपण राहत असलेले ठिकाण, ई.

उदा : समजा श्री अबक यांना 3 लाख वार्षिक सरासरी उत्पन्न आहे असे गृहीत धरले तर त्यांनी किमान ५० लाख किंवा त्यापेक्षा जास्त सम अश्यो अश्योर्ड असलेला विमा काढण्यास हरकत नाही.

कधी काढावा टर्म इंश्युरंस(Term Insurance)?

टर्म इंश्युरंस जितका लवकर जमेल तितक्या लवकर काढलेला फायदेशीर ठरतो. असे केल्याने आपल्या कमी वयोमार्यादेमुळे कमी प्रीमियम चा लाभ ही घेता येतो , आणि आरोग्य विषयक अडचणी या वयात कमी असल्याने त्या बाबतच्या एक्स्ट्रा प्रीमियम चा भार कमी होण्यास ही मदत होते.

उदा : समजा श्री अबक ३० वर्षाचे आहेत व श्री कखग ४० वर्षाचे आहेत तर सारख्याच रकमेचा विमा कदाचित अबक यांना १० हजारात व कखग यांना १८ हजारात पडू शकतो.

आता जर PPT ३० वर्ष असेल तर ८००० गुणिले ३० म्हणजेच २,४०,००० इतके निव्वळ नुकसान श्री कखग यांना झाले असे आपण म्हणू शकतो.

आता हेच ८ हजार जर कखग यांनी म्युचुअल फंडात टाकले असते तर वार्षिक सरासरी ८ टक्के जरी ग्रोथ धरली तर त्यांना ३१व्य वर्षी त्यांना ९ लाख मिळू शकले असते. (म्युचुअल फंड व ईतर गुंतवणूक , याबाबत पुन्हा बोलू पुढील एखाद्या भागात)

इंश्युरंस कोणाकोणाचा काढावा ?

गवेगळ्या कंपन्याची या बाबतची धोरणे वेगळी असतात. पण वर सांगितल्या प्रमाणे “टर्म” हा प्रकार “Income Replacement” अश्या दृष्टीने पाहिला जात असतो. त्यामुळे आपल्यावर अवलंबून व्यक्ती यांचा टर्म इंश्युरंस आपण काढू शकत नाही. थोडक्यात जी व्यक्ती कमावती आहे तिलाच टर्म इंश्युरंस घेता येतो.
पण या अडचणी ला पर्याय ही उपलब्ध आहे, तो म्हणजे लाईफ अथवा मेडिक्लेम इंश्युरंस.

आणखी काही लक्षात ठेवण्याचे मुद्दे :

 1. टर्म इंश्युरंस हा इंश्युरंस आहे, त्यामुळे त्याच्याकडे इन्वेस्टमेंट म्हणून पाहणे चुकीचे ठरते.
 2. टर्म इंश्युरंस हा नावाप्रमाणे एका “टर्म” साठी असतो हे कायम लक्षात ठेवायला हवे, त्यामुळे इथे प्रीमियम वेळेत भरणे आणि पॉलीसी “ईन-फोर्स” असणे फार महत्वाचे आहे.
 3. या इंश्युरंस चा प्रीमियम हा आपण “भविष्यातील जिवीत हानी आणि त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान” याच्या भरपाई ची फीस आहे असेच समजावे. त्यामुळे PPT अथवा टर्म संपल्यावर आपल्याला आपण भरलेले पैसे परत मिळत नसतात याची खुणगाठ पक्की असू द्यावी. (अपवाद : काही Money Back पॉलीसी)  
 4. टर्म या प्रकारात इंश्युअर्ड व्यक्तीच्या निधनाच्या नंतरच पैसा क्लेम च्या स्वरूपात परत मिळतो.  
 5. आयकर कायदा १९६१ अन्वये कलम ८०सी अंतर्गत वरील प्रकारचा प्रीमियम भरलेला असल्यास करपात्र उत्पन्नात ताबडतोब वजावटीची तरतूद आहे.
 6. याच कायद्या अन्वये , कलम १०(१०D ) नुसार हक्क वारसास मिळणारी क्लेम ची रक्कम सुद्धा १००% करमुक्त असते.
 7. वर मांडलेल्या मुद्द्या नुसार , टर्म इंश्युरंस हा “Income Replacement”  स्वरूपाचा असल्याने , गरज पडल्यास आपले उत्पन्न सिद्ध करायची वेळ येउ शकते. त्यामुळे आपले आयकर विवरण पत्र अर्थात Income Tax Return वेळेत आणि बरोबर पद्धतीने भरणे सुद्धा महत्वाचे आहे.

आपण वरील चर्चा काही उदाहरणाच्या स्वरूपात बघू :

श्री अबक, यांचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रु होते. दुर्दैवाने २०१५ साली त्यांचा मृत्यू ओढावला. त्यांच्यावर त्यांची पत्नी, २ मुले आणि आई-वडील अश्या जवाबदारीचा भार होता. परंतू त्यांनी वेळेत इंश्युरंस काढलेला नसल्याने, आज त्यांच्यावरील अवलंबून असलेल्या सर्व व्यक्तींचे जिवन अंधारात आहे. मुलांची शिक्षणे बाकी आहेत, आई-वडीलांची आजारपण, घरखर्च कसा निभावणार हा प्रश्न आ वासून उभा आहे.

काय शक्य झाले असते ?

श्री अबक यांनी वेळेत टर्म इंश्युरंस काढून त्याचा वेळच्या वेळी भरणा केला असता, तर त्यांच्या पश्चात घरच्यांना अंदाजे** ७५ लाख रुपये एकरकमी मिळाले असते.(आजच्या घडीला वयाच्या ३० किंवा कमी वयात इंश्युरंस काढल्यास वार्षिक १०-१५ हजार भरल्यास, ७०-७५ लाखाचा इंश्युरंस मिळणे सोपे आहे.)
सुदैवाने ज्या वर्षी श्री अबक यांनी प्रीमियम भरला त्या वर्षी त्यांना काही झाले नाही असे गृहीत धरले तरीही त्याचा कर-सवलतीच्या रूपाने “फुल ना फुलाची पाकळी” असा फायदा होतोच.

प्रीमियमTax Rateकर सवलतप्रीमियम
१०००० १०%१०००९०००
१००००२०%२०००८०००
१००००३०%३०००७०००


या उदाहरणामध्ये वरील प्रकारचे क्लेमचे पैसे (७५ लाख) हे करमुक्त** असतात. त्यामुळे पुढील काळाचा विचार करता आणि महागाई गृहीत धरून हे ७५ लाख रुपये श्री अबक यांच्या कुटुंबास कमीतकमी १० वर्ष नक्कीच आधार देऊ शकतात. 


पुढील भागात आपण “मेडिक्लेम” आणि “हेल्थ” इंश्युरंस या बद्दल चर्चा करूत.

विमा आणि गुंतवणुकीविषयी येथे वाचा

लेखकाविषयी:

सीए केदार दत्तात्रेय गोगटे

B.Com ; F.C.A.; M.C.A.; D.I.S.A. (ICAI’ New Delhi), Cert. Fraud Analyst and Investigator (ICAI New Delhi); Certified Bank Concurrent Auditor (ICAI New Delhi); Cert CBA (ICAI) ; IBM Certified Work-flow ,Content Designer & Developer; हे औरंगाबाद येथील प्रतिथयश “सनदी लेखापाल” (Chartered Accountant) आहेत. गेल्या १०+ वर्षांपासून ते विविध प्रकारच्या लोकांना करविषयक, व्यवसाय विषयक, Technology विषयक मार्गदर्शन करत आहेत.

तसेच ते Corporate Trainer म्हणून सुद्धा कार्यरत असून विविध आस्थापना, तंत्रशिक्षण व व्यवस्थापन संस्थांमध्ये विद्यार्थी व व्यावसायिकांना विविध विषयांवर मार्गदर्शन करतात.

आपल्या मनात कुठल्याही शंका असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. आम्ही तुमच्या शंकांचे समाधान करण्याचा नक्की प्रयत्न करू.

source link: https://invest-mentors.blogspot.com/2015/05/blog-post_5.html

Related posts

Leave a Comment