तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज.

तीन दिवसांत पी एफ? पूर्ण प्रक्रिया, समज आणि गैरसमज.

तुम्हाला तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ मधील काही किंवा पूर्ण रक्कम काढायची आहे?

तुम्हाला कुणीतरी तीन दिवसांत पीएफ काढता येतो म्हणून सांगितले आहे? किंवा तसे आश्वासन देऊन कमिशन लाटण्याचा प्रयत्न केला आहे?

मग हा लेख शेवटपर्यंत वाचा कारण या लेखात आपण यु ए एन क्रमांक ऍक्टिव्ह करण्यापासून (UAN Activation) ते पैसे काढण्यापर्यंत (PF Claim) पूर्ण प्रक्रिया तसेच या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी यांची माहिती घेणार आहोत.

हा लेख पूर्ण वाचल्यावर तुम्हाला स्वतःलाच कळेल की आपला पीएफ क्लेम करण्यासाठी किती वेळ लागू शकेल. त्यामुळे कोणत्याही खोट्या आश्वासनांना बळी पडण्यापासून तुम्ही वाचू शकाल.

प्रथमत: आपण पूर्ण प्रक्रिया थोडक्यात पाहूया त्यानंतर एक एक मुद्दा त्यातील अडचणींसह सविस्तरपणे पाहू.

  1. युएएन ऍक्टिव्हेशन(UAN Activation)
  2. पासवर्ड बदलणे(Change UAN PAssword)
  3. नाव/जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे/बदलणे (Check/Change Name/Date of Birth)
  4. केवायसी(KYC)
  5. पीएफ सुरु केल्याची/सोडल्याची तारीख तपासणे.(Update Joining Date/Exit Date)
  6. पीएफ क्लेम (PF Claim)
  7. किती टक्के पैसे मिळतील?

1) युएएन ऍक्टिव्हेशन(UAN Activation)

पीएफ खात्याचा युएएन ऍक्टिव्ह करण्यासाठी तुम्हाला तुमचा पीएफ क्रमांक किंवा युएएन क्रमांक तुमच्या एच आर किंवा कंत्राटदाराकडून घ्यावा लागेल. या क्रमांकाबरोबर तुमच्याकडे एक मोबाईल क्रमांक तसेच तुमची जन्मतारीख माहित असणे आवश्यक आहे. 

येणाऱ्या अडचणी:

जर तुमच्या येऊ आर ने किंवा कंत्राटदाराने तुमचे पीएफ खाते तयार करताना तुमची जन्मतारीख चुकीची टाकली असेल तर तुमचा युएएन ऍक्टिव्हेट व्हायला अडचणी येउ शकतात. त्याचबरोबर तुमच्या खऱ्या नावात आणि पीएफ खात्यात असलेल्या नावात जर खूप जास्त फरक असेल तरी तुमचा युएएन ऍक्टिव्ह होऊ शकत नाही. 

ऍक्टिव्हेशनच्या वेळी विचारला गेलेला ओटीपी तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर येईल तो वेळेत देणे गरजेचे आहे. 

2) पासवर्ड बदलणे(Change UAN Password)

तुम्ही तुमचा युएएन ऍक्टिव्हेट केल्यावर तुम्हाला तुम्ही दिलेल्या मोबाईल क्रमांकावर एक एसएमएस येईल ज्यात तुमच्या खात्याचा पासवर्ड असेल. हा पासवर्ड शक्यतो बदलावा व तुमच्या लक्षात राहील असा पासवर्ड ठेवावा. पासवर्डमध्ये किमान एक इंग्रजी कॅपिटल अक्षर, किमान एक लहान अक्षर तसेच किमान एक अंकासह एक तरी स्पेशल कॅरेक्टर(@#$%^&*!) असावे.

3) नाव/जन्म दिनांक बरोबर असल्याची खात्री करणे/बदलणे (Check/Change Name/Date of Birth)

बऱ्याचदा तुमच्या एम्प्लॉयरकडून तुमच्या पीएफ खात्यात तपशील टाकताना नावात किंवा जन्मतारखेत चुका असण्याची शक्यता असते. अश्या वेळी तुम्हाला तुमचे नाव किंवा जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज करावा लागू शकतो. काळजी नसावी, हा अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठेही जायचे नसून फक्त आपल्या पीएफ अकाउंट मध्ये लॉगिन करून Manage मेन्यूमध्ये Basic Details या पर्यायाला निवडून तुमच्या आधार कार्ड क्रमांकाबरोबर तुमचे योग्य तपशील द्यायचे आहेत. 

येणाऱ्या अडचणी:

तुमचे आधार कार्ड वरील तपशील योग्य असणे गरजेचे आहे. ते बरोबर नसल्यास आधी ते बरोबर करून घेणे पुढील प्रक्रियेसाठी महत्वाचे आहे. 

तुमची खरी जन्मतारीख आणि पीएफ खात्यावरील जन्मतारीख यात जर एक वर्षापेक्षा जास्त फरक असेल तर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेचा पुरावा अपलोड करावा लागेल. यासाठी जन्माचा दाखल(Birth Certificate) किंवा शाळा सोडल्याचा दाखला(Leaving Certificate) आवश्यक आहे.

चूक सुधारण्यासाठी लागणारा कालावधी: 

तुमच्या एम्प्लॉयरने तुमच्या विनंतीला मान्यता(अप्रूव्हल) दिल्यानंतर पीएफ विभागाकडून एक ते चार दिवस लागू शकतात. कधीकधी हा कालावधी जास्तही असू शकतो. तुमच्या एम्प्लॉयरने लवकरात लवकर अप्रूव्हल देणे या बाबतीत फायदेशीर होऊ शकते.

4) केवायसी(KYC)

केवायसी साठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच एका बॅंकेचा खाते क्रमांक तसेच आयएफएससी (IFSC) कोड असणे आवश्यक आहे.

येणाऱ्या अडचणी: 

तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड यावरील तुमचे नाव आणि जन्मतारीख सारखे असणे खूप महत्वाचे आहे. यात चुका असल्यास तुम्हाला त्यात आधीच सुधारणा करून घ्याव्या लागतील.  

पूर्ततेसाठी लागणारा कालावधी:

या प्रक्रियेलाही नाव/जन्मतारीख प्रमाणेच केवायसी साठीही तुमच्या एम्प्लॉयरचे अप्रूव्हल मिळणे आवश्यक असते. त्यामुळेच तुमच्या एम्प्लॉयरने लवकरात लवकर अप्रूव्हल दिल्यानंतर पीएफ विभागाकडून एक ते चार दिवस लागू शकतात. कधीकधी हा कालावधी जास्तही असू शकतो.

5) पीएफ सुरु केल्याची/सोडल्याची तारीख तपासणे.(Update Joining Date/Exit Date)

पीएफ खात्यातुन पैसे काढण्यासाठी आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचा पीएफ जमा होणे चालू झाल्याची आणि तुम्ही काम सोडले असल्यास तुम्ही काम सोडल्याची तारीख अद्ययावत आहे कि नाही हे तपासणे. बऱ्याचदा या तारखा तुमच्या एम्प्लॉयरने अपडेट केलेल्या नसतील तर तुम्हाला पीएफ काढताना अडचणी येऊ शकतात. यासाठी तुम्हाला तुमच्या एम्प्लॉयरवर अवलंबून राहावे लागेल. 

पूर्ततेसाठी लागणारा कालावधी:

ही प्रक्रिया पूर्णपणे तुमच्या एम्प्लॉयरवर अवलंबून असल्याने त्यांनी तपशील भरले की लगेचच संबंधित तारखा अपडेट होतात. 

त्याचप्रमाणे जर तुम्ही काम सोडलेले असेल तर तुम्ही काम सोडलेल्या महिन्यानंतर दोन महिन्यांनी काम सोडल्याची तारीख(Exit Date) तुम्हाला अपडेट करता येते. यासाठी मात्र तुमच्या आधार कार्डला मोबाईल क्रमांक जोडलेला असणे आवश्यक आहे. 

6) पीएफ क्लेम (PF Claim)

वर दिलेल्या सगळ्या पायऱ्या पूर्ण केल्यानंतरच तुम्ही पीएफ क्लेम करू शकाल. आणि या पायऱ्या पूर्ण होण्यासाठी  फक्त तीन दिवस लागणार नाहीत हेही तुमच्या लक्षात आले असेल. त्यामुळे कुणाच्याही खोट्या आमिषांना बळी  न पडता योग्य मार्गदर्शन करणाऱ्या सल्लागाराकडेच जा. 

क्लेम करण्यासाठी आवश्यक बाबी: 

अ) वरील सर्व पायऱ्या पूर्ण झालेल्या असाव्यात.

ब) आधार कार्डशी मोबाईल क्रमांक संलग्न असणे आवश्यक आहे. 

क) क्लेम करताना आलेला ओटीपी वेळेत भरणे आवश्यक आहे. 

ड) क्लेम करण्यासाठी बँक पासबुक किंवा चेक अपलोड करणे आवश्यक आहे.

पीएफ संबंधी आपल्या मनातील समज-गैरसमज या लेखातून काही प्रमाणात निश्चितच कमी झाले असतील.

तुम्हाला पीएफ क्लेमच्या प्रक्रियेबद्दल थोडक्यात माहिती देणे हे या लेखाचे उद्दिष्ट असून आपल्या मनात आणखी काही शंका असल्यास आपण त्या कमेंट करू शकता. लवकरच आम्ही तुमच्यासाठी पूर्ण तपशीलवार लेख घेऊन येत आहोत त्या लेखात आपल्या शंकांचे निरसन करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू.

-कल्पेश गावळे

इंस्टाग्रामफेसबुकईमेल

Read Also:

Related posts

Leave a Comment